प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात वीज वितरणाचे जाळे सक्षम करण्याचा निर्णय घेतला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला तातडीने प्रतिसाद देत राज्यात याची अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला.जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीजपुरवठा होईल.केंद्र व राज्याच्या धोरणानुसार जिल्ह्यातील नवीन उपकेंद्रांची उभारणी व श्रेणीवर्धन करण्यासाठी प्रस्ताव सादर केले. त्यालाच आता केंद्र आणि राज्य सरकारसह आशियाई विकास बँकेकडून निधी उपलब्ध झाला आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यात माहिर असलेल्या खासदाराने मात्र आपल्यामुळेच या कामांना मंजुरी मिळाली असल्याचा कांगावा सुरू केला आहे. मागील सहा वर्षात एक रुपयाचा विशेष निधी न आणू शकलेला खासदाराची न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी सुरू असलेली केविलवाणी धडपड लाजिरवाणी आहे.(ADV. Nitin Bhosale on Om rajenimbalkar)
खासदार राजेनिंबाळकर यांची न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची नौटंकी जिल्ह्यातील नागरिकांसाठी नवी नाही. प्रत्यक्ष काम न करता केवळ बोलबच्चनगिरी करण्यात माहिर असलेल्या बोलघेवड्या खासदाराकडून कामाची रचनात्मक अपेक्षा करणे म्हणजे दगडावर डोके आदळून घेण्याजोगेच आहे. योग्य दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात नवीन उपकेंद्र आणि जुन्या उपकेंद्रची क्षमता वाढ करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील उपकेंद्राच्या अनुषंगाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सतत पाठपुरावा केला. जिल्ह्यातील नवीन उपकेंद्रांसह जुन्या उपकेंद्राच्या श्रेणीवर्धनाचे सविस्तर प्रस्ताव तयार केले.यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित यंत्रणेसोबत अनेक बैठका घेतल्या.आता त्याच प्रस्तावासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच आशियाई विकास बँकेकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ही माहिती मिळताच आपणच हे सगळे काम केले असल्याचा नेहमीप्रमाणे खोटारडा प्रचार खासदाराने सुरू केला आहे.
वरील सर्व कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल दिनांक ३ ऑक्टोबर रोजी (DPR) सादर झाला आणि तो सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. लवकर प्रस्ताव मंजूर होणार हे लक्षात येताच खासदार राजेनिंबाळकर यांनी सांगण्यासारखे रचनात्मक काहीच काम स्वतःकडे नसल्यामुळे या कामाचे श्रेय घेण्यासाठी लाजिरवाणी धडपड सुरू केली आहे. एखादे काम झाले की “माझ्या प्रयत्नांमुळेच झाले”, आणि नाही झाले की “सरकारमुळे झाले नाही” असे रेटून खोटे बोलणाऱ्या खासदाराचे खरे रूप आता स्पष्ट होऊ लागले आहे. मागील सहा वर्षात १ रुपया निधी आणता आला नाही. त्यांचे नेते राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा जिल्ह्यासाठी कामगिरी शून्य आणि दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायला मात्र सर्वात पुढे. केविलवाणी आणि लाजिरवाणी धडपड करणाऱ्या खासदार महोदयांनी सुरू केलेला खोटारडेपणा आणि अर्धवट माहिती आधारे चालवलेली नौटंकी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या आहेत.








