पक्षापेक्षा काही मंत्र्यांना इतर कामं जास्त असतील तर मंत्रीपद दुसऱ्या कोणालातरी द्यावं लागेल असा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वपक्षातील मंत्र्यांना दिला आहे. बऱ्याचदा मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात. तिथे पक्षातील जिल्हाध्यक्षाला विचारत नाहीत, त्यांच्याकडे पाहतही नाहीत. त्यांच्याशी बोलत नाही. तो आपल्या परिवारातील घटक आहे त्यामुळे असं वागू नका. आपल्याला तसं करून चालणार नाही. माझ्यासह सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील मंत्र्यांचे कान टोचले आहेत. (Ajit Pawar on Ministers)
मंत्र्यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा
नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात अजित पवार म्हणाले की, आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया, ते दुसऱ्या कुणाला तरी देऊया.
पूर्वीच्या आणि आत्ताच्या राजकारणात जमीन अस्मानचा फरक
नुसते शिबिर घेऊन चालणार नाही. या शिबिरात जे निर्णय होतील त्यांची अंमलबजावणी करणार आहे. संघटना संघटनेचे काम करेल. काही गोष्टीत बदल करायच्या आहेत. पूर्वीच्या राजकारणात आणि आत्ताच्या राजकारणात जमीन अस्मानचा फरक आहे. सोशल मिडिया सक्रीय आहे. एखाद्या बाबींत मागचे पुढचे बाजूला करून काही क्लिप दाखवून ट्रोल केले जाते. काही कामे करत नाहीत त्यांना प्रसिद्धी मिळते. काही कामे करतात परंतु त्यांना प्रसिद्धी मिळत नाही असंही अजित पवारांनी सांगितले.









