इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी (दि. २१ ऑगस्ट) अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभा खासदार राहुल गांधी उपस्थित होते. काल बुधवारी (दि. २० ऑगस्ट) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. यामुळे उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट सामना होईल.(vice president election 2025)
कोण आहेत बी. सुदर्शन रेड्डी?
बी. सुदर्शन रेड्डी हे कायद्याच्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. ७९ वर्षीय बी. सुदर्शन रेड्डी यांनी २७ डिसेंबर १९७१ रोजी आंध्र प्रदेश बार कौन्सिल, हैदराबाद येथे वकील म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात वकिली केली. २ मे १९९५ रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ५ डिसेंबर २००५ रोजी ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. पुढे १२ जानेवारी २००७ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आणि ते ८ जुलै २०११ रोजी निवृत्त झाले.
कोण आहेत सी. पी. राधाकृष्णन?
चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन, अर्थात सी. पी. राधाकृष्णन, यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. ३१ जुलै २०२४ पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी, त्यांनी फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ या काळात झारखंडचे राज्यपाल म्हणून आणि मार्च ते जुलै २०२४ या काळात तेलंगणाच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला आहे. तसेच, मार्च ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत त्यांनी पुद्दुचेरीच्या उपराज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही पाहिला आहे.
उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक
उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होईल. यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान होईल. त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट आहे. तर २२ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारांना नामांकन अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट आहे.