धाराशिव जिल्ह्यात मागील साडेचार महिन्यांपासून थांबलेल्या 268 कोटी रुपयांच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामांना अखेर गती मिळणार आहे. या कामांवरील स्थगिती उठवण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत जाहीर केले.भूम-परांड्याचे तीन टर्मचे माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हि घोषणा केली.(suspension of the work of the Dpdc has been lifted)
अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत मंगळवारी बैठक घेतल्याचे सांगितले. या बैठकीत स्थगिती उठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महायुतीतील तिन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींना ठराविक सूत्रानुसार निधी वितरित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार नसतानाही जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून काही हिस्सा राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच, राहुल मोटे यांना महायुतीतील इतर पक्षांशी समन्वय साधण्याचा सल्लाही दिला.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कामांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या कामामध्ये अनियमितता असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. गेल्या २५ मार्च रोजी पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दिलेल्या पत्रानुसार नियोजन समितीच्या कामांवर स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान स्थगिती हटवली गेल्याने जिल्ह्याच्या विकासाला पुन्हा चालना मिळणार आहे.