राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानात होणार होतं, मात्र हाय कोर्टाकडून आता मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी आझाद मैदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे.(Manoj Jarange On High court Decision)
हाय कोर्टानं आझाद मैदानाची परवानगी नाकरल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, मनोज जरांगे पाटील यांनी आता हाय कोर्टाच्या निर्णयानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हाय कोर्टानं आझाद मैदानाची परवानगी नाकारल्यानंतर देखील मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरच आंदोलन करण्यावर ठाम आहेत.
आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणारे लोक
आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणारे लोक आहोत, , न्याय देवता आम्हाला न्याय देईल, आमच्या वकील बांधवांची देखील टीम आहे, ते न्यायालयात जातील. आम्हाला न्याय मिळेल. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहोत, आणि लोकशाही पद्धतीने करण्यात येणारं आंदोलन कधीही रोखता येत नाही. सरकारने गोर गरिबाच्या भावनांशी खेळू नये, शंभर टक्के आम्हाला न्यायालयाकडून परवानगी मिळणार, नाकारण्याचं कारणच काय? नाकारण्याचं कारण त्यांना द्यावं लागेल, आम्ही मुंबईत जाणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही 27 ऑगस्टला निघणार आहोत. आम्ही एकही नियम मोडणार नाही, आमचे वकीलही न्यायालयात जाणार आहेत. आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देण्यास नेमकी अडचण काय आहे.
सरकारने कितीही अडकाठी केली तरी आम्ही आंदोलन करणार, देवेंद्र फडणवीस यांना आरक्षण देणं जीवावर आलं आहे, न्यायालयाला आमचीही बाजू ऐकून घ्यावी लागेल. 29 तारखेला मी आझाद मैदानावर येणार आहे, आमचे वकील बांधव न्यायालयात जातील, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, त्यामुळे मी आता यावर जास्त बोलणार नाही, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.