पुण्यात शनिवारी रात्री खराडी परिसरातील एका हाय-प्रोफाइल पार्टीवर पोलिसांनी धडाकेबाज छापा टाकला. या कारवाईने राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे. कारण या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली. त्यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण खडसे यांनी या कारवाईवर गंभीर आक्षेप घेत, पत्रकार परिषदेत पुणे पोलिसांवर राजकीय सूड आणि कुटुंबाला बदनाम करण्याचा थेट आरोप केला. विशेष म्हणजे, त्यांनी “रेव्ह पार्टी म्हणजे काय?” असा थेट सवाल उपस्थित करत, या प्रकरणाला नवे वळण दिले आहे.(Eknath Khadase Press conference)
राजकीय सुडातून कारवाई, एकनाथ खडसेंचा आरोप
एकनाथ खडसे यांनी या कारवाईनंतर पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. हा खरोखर कायदेशीर तपास आहे की सरकारविरोधात बोलणाऱ्यांना शांत करण्याचा डाव आहे? असा प्रश्न खडसेंनी विचारला. “सात जण एका खोलीत बसले, संगीत नाही, डान्स नाही, गोंधळ नाही, याला रेव्ह पार्टी म्हणायचं? पोलिसांनी रेव्ह पार्टीची व्याख्या स्पष्ट करावी. माझ्या जावयाकडे कोणताही ड्रग्ज सापडला नाही, मग त्याला मुख्य आरोपी का बनवलं? ही माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याची खेळी आहे!,” असा आरोप खडसेंनी केला.