वर्षानुवर्षे ज्यांनी ओबीसी समाजाला पाण्यात पाहिले, त्यांना आता हा समाज आठवला आहे. ज्यांनी ओबीसी समाजाचा केवळ भाषणापुरता आणि मतांच्या राजकारणाचा वापर केला त्यांना ओबीसींनीच शक्ती काय असते, हे दाखवून दिले आहे. हे लक्षात आल्यानेच यात्रेवरून नवे ‘सोंग’ सुरू आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मंडल यात्रेवर निशाणा साधला.(devendra fadanvis on sharad pawar)
नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या ‘गरुड दृष्टी’ या ‘सोशल मीडिया मॉनिटरिंग’ साधनाच्या सादरीकरणाचे अवलोकन आणि सायबर फसवणुकीत बळी पडलेल्यांना १० कोटी रकमेच्या परताव्याचे वितरण करण्यासाठी पोलीस मुख्यालयात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, आजवर ज्यांनी ओबीसी समाजाचा केवळ मतांच्या राजकारणासाठी वापर केला त्यांना आता समाज दुरावल्याचे लक्षात आल्यावर मंडल यात्रा सुचली आहे. नुसती यात्रा काढून चालणार नाही तर ओबीसींच्या पाठीशी ठाम उभे आहात हे कधीतरी दिसू द्या, असे फडणवीस म्हणाले.
पोलीस अथवा निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही?
शरद पवार यांनी नागपुरात विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसे भेटायला आली होती. त्यांनी २८८ जागांपैकी १६० जागा निवडून आणण्याची गॅरंटी दिली होती, असा गौप्यस्फोट शनिवारी केला होता. त्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, ही ‘सलीम-जावेद’ची कथा सुरू आहे. तुम्ही जबाबदार नागरिक आहात. अशाप्रकारे तुमच्याकडे कोणी आले तर तुम्ही पोलीस अथवा निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही. तुम्ही त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का? या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत, असे फडणवीस म्हणाले.