2006 साली मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत आज मुंबई उच्च न्ययालयाने धक्कादायक निकाल दिला आहे. न्यायालयाने याप्रकरणातील 12 दोषींना निर्दोष मुक्त केलं असून, त्यांच्या विरोधातील आरोप सिद्ध करण्यात यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरल्याचा ठपका हे निकालपत्र सुनावताना न्यायालयाने ठेवला आहे. (mumbai local blasts 2006 12 convicts acquitted)
या प्रकरणात 2015 मध्ये विशेष न्यायालयाने 5 आरोपींना फाशी व 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनवली होती. आरोपींनी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. साक्षी पुरावे तपासाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निकाल फिरवत सर्वच आरोपींची शिक्षा रद्द केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं की, पुरावे अपुरे, विसंगत आणि अविश्वासार्ह होते. त्यामुळे आरोपींना दोषी ठरवण्याजोगा ठोस आधार उरलेला नव्हता.परिणामी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
11 मिनिटात हादरली होती मुंबई (2006 mumbai local blasts)
2006 साली 11 जुलै रोजी, संध्याकाळी अवघ्या 11 मिनिटांच्या आत, मुंबईच्या पश्चिम उपनगरी लोकल मार्गावरील 7 गाड्यांमध्ये स्फोट झाले. हे स्फोट टायमरद्वारे सक्रिय प्रेशर कुकर बाँब वापरून घडवण्यात आले होते. या भीषण घटनेत 209 जणांचा मृत्यू झाला, तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं होतं.
या स्फोटांमागे लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात MCOCA, UAPA आणि स्फोटक पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयात 230 साक्षीदार, 50 पेक्षा अधिक पंचनामे, तांत्रिक पुरावे, आणि कॉल रेकॉर्ड्स सादर करण्यात आले.मात्र, न्यायालयाच्या मते, या सर्व पुराव्यांमध्ये गंभीर त्रुटी होत्या, आणि त्यामुळे आरोपींना दोषी ठरवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकला नाही.