मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरात सर्किट बेंच मागणीला अखेर 40 वर्षानंतर यश आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी सर्किट बेंच मंजुरीची अधिसूचना जारी केली आहे.. या अधिसुचनेनुसार 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सर्किट बेंचचे कामकाज सुरू होणार आहे. यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकिलांसह नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
सर्किट बेंच म्हणजे काय, याचा नेमका काय फायदा होतो?
हायकोर्टाची सर्किट बेंच (Circuit Bench) म्हणजे उच्च न्यायालयाचा एक तात्पुरता किंवा अस्थायी विभाग. हे खंडपीठ मुख्य न्यायालयाच्या क्षेत्राबाहेरील दूरच्या भागांमध्ये खटले ऐकण्यासाठी स्थापन केले जाते. सर्किट बेंच विशिष्ट कालावधीसाठी, सहसा वर्षातून काही दिवस किंवा महिने काम करते. त्यामुळे हे नियमितपणे चालणाऱ्या कायमस्वरूपी खंडपीठासारखे नसते.सर्किट बेंच सुरु करण्याचं मुख्य उद्दिष्ट दूरच्या किंवा दुर्गम भागातील लोकांना न्याय मिळवून देणे आणि मुख्य न्यायालयात जमा झालेल्या प्रकरणांचा निपटारा करणे हे असते. सर्किट बेंचमुळे याचिकाकर्ते आणि वकिलांना मोठ्या शहरांमधील मुख्य न्यायालयात जाण्याचा प्रवास खर्च आणि त्रास वाचतो.