तुळजापूर शहरात आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचा पहिला दिवस गायक इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत, जुईली जोगळेकर व पद्मनाभ गायकवाड यांच्या सुरेल गाण्यांनी गाजला. विशेष म्हणजे रोहित व जुईली जोडीने एकसे बढकर एक भक्तीगीत गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या गोंधळ व जोगवा गीतांनी तर रसिकांना भर पावसात ठेका धरायला लावला.(Tulja Bhavani Sharadiya Mahotsav)
श्री तुळजाभवानी देविजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवास सोमवारी नवरात्रोत्सवाच्या प्रथम माळेदिनी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी गायक राऊत, जोगळेकर व गायकवाड यांनी सुरेल भक्तिगीतांद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गीत गाऊन रोहीत, जुईली जोडीने भाविकांना श्री तुळजाभवानी, पांडुरंग, खंडोबा यांचे दर्शन घडवले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांचे यांचा प्रेरणादायी इतिहास सांगितला. नटराज पूजनानंतर हे नटराज नटराय.. या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जय जय रामकृष्ण हरी.., अवघे गर्जे पंढरपुरी.., माझे माहेर पंढरी.., लल्लाटी भंडारी.., नवरी नटली.., जेजुरीचा खंडेराया जागराला यावे.. राजे आले राजे जिंकुन गडावरी.., उदे ग अंबे उदे.. यासह एकापेक्षा एक सरस भक्ती व गोंधळ नृत्य गीतांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमात रसिकांना गायकांनी थेट संवाद साधत लातूरची बोलीभाषा वापरून रंगत आणली. गायक स्वतःही भक्तिगीतांवर नृत्य करत तरुणाईला उत्स्फूर्त नृत्य करायला भाग पाडत होते. शेवटी आई तु गोंधळाला.. या गीताने या संगीतमय कार्यक्रमाचा समारोप झाला.
यावेळी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष किर्ती किरण पूजार उपस्थित होते. अतिवृष्टीच्या पाहणीत व्यग्र असतानाही त्यांनी कार्यक्रमाचा शेवटी हजेरी लावून गायकांचे कौतुक केले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रंगलेल्या या कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या महोत्सवाचे उद्घाटन सौमय्याश्री पुजार, आ. प्रवीण स्वामी व तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनीही हजेरी लावली. यावेळी लेखाधिकारी संतोष भेंकी, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.








