धाराशिव : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात अत्याधुनिक शस्त्रक्रियागार आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने अत्यावश्यक असलेल्या महत्वपूर्ण कामांना राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आपल्या आयुर्वेद महाविद्यालयास ३९.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या निधीपाठोपाठच आयुर्वेद महाविद्यालयातही आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय सुरू झाला असल्याची माहिती ‘मित्र’चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या अथक प्रयत्नातून धाराशिव शहरात १९८६ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाची भव्य इमारत उभारली आहे. आजघडीला तेथे एकूण १४ विविध विभाग कार्यरत असून ३१८ विद्यार्थी वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत आहेत. ६५ डॉक्टर याठिकाणी पदव्युत्तर शिक्षण घेत असून आयुर्वेदात १७ विद्यार्थी संशोधन करीत आहेत. १३२ खाटांची क्षमता असलेल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रारंभी केवळ २५ एवढी प्रवेश क्षमता होती. आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून ही क्षमता आता ६० इतकी झाली आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. गंगासागरे यांनी रुग्णांना अधिक दिलासा मिळावा यासाठी सुसज्ज शस्त्रक्रियागार आणि विविध वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने आपल्याकडे निधीची मागणी केली होती. या सर्व बाबींचा रीतसर प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून तातडीने प्रस्तावास हिरवा कंदील मिळाला असून ३९.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयशी संलग्न असलेल्या आयुर्वेद रुग्णालयात आता जिल्हा आणि परिसरातील रुग्णासाठी लवकरच अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. रुग्णसेवेच्या गुणवत्तेत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी महत्वाच्या आधुनिक सुविधा कार्यान्वित करण्यासाठीच हा ३९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून १२ कोटी रुपयांची स्किल लॅब उभारली जात आहे. लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. आत्ता मंजूर करण्यात आलेल्या ३९.५० कोटी रुपयांच्या भरीव निधीतून सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष व उपकरणे (Modular OT) साकारण्यात येणार आहे. त्यामुळे अचूक, सुरक्षित आणि आधुनिक शस्त्रक्रिया करता येणारे अद्ययावत ऑपरेशन थिएटर शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर केंद्रीकृत निर्जंतुकीकरण विभागही (CSSD) उभारला जाणार आहे जेणेकरून सर्व वैद्यकीय उपकरणांचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्जंतुकीकरण शक्य होणार आहे. वाढती रुग्णसंख्या ध्यानात घेऊन वैद्यकीय गॅस पुरवठा यंत्रणाही कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया कक्ष, ICU, नवजात शिशू ICU, आपत्कालीन सेवा व पुनर्वसन विभागासाठी सतत वैद्यकीय गॅसची उपलब्धता राहणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
रुग्णांसाठी सशक्त वैद्यकीय पाऊल
धाराशिव जिल्हा आणि परिसरातील नागरिकांसाठी ही केवळ वैद्यकीय सुविधा नाही, तर रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक सशक्त पाऊल आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, स्वच्छ व आधुनिक पद्धतीने करता येतील, रुग्णालयातील संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होईल, ICU व नवजात शिशूंसाठी अत्याधुनिक सुविधा, आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी उपचार आणि उपचारांचा दर्जा उंचानार आहे.निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्यातील जनतेच्या वतीने मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे,मा.उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार आणि मा. वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आभार मानले आहेत.