राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत घालून देण्यात आलेल्या निकषात अनेक गावे बसत नाहीत. निकषात न बसणाऱ्या अनेक महसल मंडळातील गावांमध्येही ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झालेले आहे. धाराशिव जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात ६८.८% अधिकचा पाऊस नोंदविला गेला आहे. या मोठ्या आणि सततच्या पावसामुळे झालेले नुकसानही मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.(MLA Ranajagjitsinh Patil demands to Agriculture Minister)
राज्यभरात सगळीकडेच ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातही अगदी तशीच स्थिती आहे. धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सरासरी पेक्षा ६८ टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, ओढे अद्यापही ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अक्षरशः शेतजमीन पूर्णतः खरवडून गेली आहे. पुराच्या पाण्यामुळे विहिरी गाळाने भरल्या आहेत. शेतातील ड्रिपसेटही वाहून गेले आहेत. अशी स्थिती असताना जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात नोंदविण्यात आलेल्या पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. ही बाब विचारात घेवून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
ऑगस्ट महिन्यात राज्यभर सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या मोठ्या व सातत्यपूर्ण पर्जन्यमानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एन.डी.आर.एफ. व एस.डी.आर.एफ. च्या निकषात न बसणाऱ्या महसुली मंडळातील गावांमध्ये देखील पिकांचे ३३% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. नुकसान निश्चितीची जबाबदारी कृषी विभागाची असल्याने वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून ३३% पेक्षा जास्त पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता सर्व शेतीचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना शासकीय अनुदान तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने अधिक खबरदारी घ्यावी
जिल्ह्यातील काही भागात पशुहानी झाली आहे. शेतकरी बांधवांनी नुकसानीची माहिती आणि जनावरे दगावली असल्यास याबाबतही तातडीने तक्रारी नोंदवाव्यात. पुढील काळात आणखी पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. बहुतांश बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. अनेक साठवण तलाव, मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे पुढील पाऊस जास्त नुकसानकारक ठरण्याची भीती आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी व आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचनाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या आहेत.