जलसंपदा विभाग आणि शासकीय आयटीआयची जागा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे येथील शासकीय आयटीआयचे स्थलांतर करून नवीन अध्यायवत संकुल बांधण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या बांधकामासाठी यापूर्वीच रुपये ४३५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. आता आयटीआयसाठी ४० कोटीचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.(40 cr for Dharashiv ITI)
जवळपास 1 लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्यात येणार
धाराशिव- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या एकूण ११.६३ हेक्टर जागेपैकी ५.३० हेक्टर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. उर्वरित जागेवर आयटीआय ची मुख्य इमारत, वर्कशॉप व मोकळी जागा आहे. या ठिकाणी सद्याचे एकत्रित बांधकाम जवळपास ९० हजार चौरस फुट आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शासकीय आयटीआयसाठी नव्याने उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या रु. ४० कोटी निधीच्या माध्यमातून जवळपास 1 लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रस्तावित असलेली ही नवीन इमारत देशपांडे स्टँड परिसरातील कौशल्य विकास विभागाच्या तंत्रनिकेतन प्रशालेच्या मोकळ्या जागेत उभारायची की सध्याच्या जागेत उभारायची याबाबतचा निर्णय कौशल्य विकास विभाग घेणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
मोठ्या उद्योग समूहा बरोबर रोजगार निर्मिती साठी करार
मोठ्या उद्योग समुहाच्या सहकार्याने राज्यातील काही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. खाजगी भागीदारी तत्त्वावर नामांकित कंपन्या यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत. या प्रतिथयश कंपन्यामधील गरजेनुसार सुधारित अभ्यासक्रम निर्माण केले जाणार आहेत. त्याच कंपन्यांच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. ‘मित्र’ संस्थेच्या माध्यमातून यावर काम सुरु आहे. या सगळ्या प्रक्रियेत आवर्जून धाराशिव जिल्हाचा समावेश करण्यात येणार आहे.