कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर तीन तरुणींनी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता या घटनेनें पुण्यातील पोलीस दलात खळबळ माजली होती. तरुणींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली खरी मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला. कोणत्याही घटनेत गुन्हा दाखल करत असताना पुरावे पाहिले जातात मात्र यामध्ये मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पुरावे नसल्याचं सांगत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
या घटनेची दखल सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत कायदा आणि सुव्यवस्थेवरती सरकारला प्रश्न विचारला होता. राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तक्रार देणाऱ्या मुलींशी संवाद साधत त्यांची बाजू जाणून घेण्याचं प्रयत्न केला. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीं कारवाई करावी अशी प्रशासनाकडे मागणी केली आहे.
पोलसांनी पत्रात काय म्हटले आहे?
मुलींनी ज्याबाबत तक्रार केली आहे, ती घटना एका खोलीत घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. मुलींनी जी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य आढललेले नाही. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सुरुवातीला पोलिसांनी रात्री 11 वाजेपर्यंत तुमच्या तक्रारीबाबत काय घडते, ते कळवू, असे मुलींना सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही या मुली, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. अखेर रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी आम्ही गुन्हा दाखल करु शकत नाही, असे सांगत हे पत्र मुलींना दिले. त्यामुळे मुली संतापल्या आणि त्यांनी हे पत्र फाडून टाकले.