येरमाळ्यातून जाणाऱ्या सोलापूर धुळे महामार्गावरील चोराखळी येथील महाकाली कलाकेंद्र परिसरातील एका डान्सबारसमोर सोमवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात संदीप यल्लाप्पा गुट्टे ( ४०) हे जखमी झाल्याची माहिती मिळाली असून,त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.( crime yermla kalakendra firing)
येरमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील येरमाळा ते धाराशिव रस्त्यावरील चोराखळी येथील धाराशिव कारखान्याजवळ असलेल्या ‘कालिका कलाकेंद्राजवळ रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी एक डान्सबार चालवला जातो. संदीप गुट्टे हे आपला मित्र अरुण जाधव यांच्यासोबत याठिकाणी आले होते. नाट्यगृहाबाहेर असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली, यात ते जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण
जखमी गुट्टे यांचा मित्र अरुण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गुट्टे आणि कला केंद्र चालक अक्षय साळुंके यांच्यात जुने भांडण होते. याच वादातून अक्षय साळुंके आणि त्याच्या साथीदारांनी संदीप गुट्टे यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून,पोलीस पुढील तपास करत आहेत.घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.