पाणीपुरवठा समितीचे सभापती विलास लोंढेंच्या अधिकाऱ्यांना सूचना
धाराशिव : आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि भाजप युवा नेते मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्या सूचनेनुसार तेर येथे सुरू असलेल्या योजनेच्या कामाची धाराशिव नगर परिषदेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती विलास लोंढे यांनी नुकतीच पाहणी केली. शहरातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता तेरणा धरणातून धाराशिव शहराला होणारा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी अटल अमृत-२ योजनेच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही लोंढे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून तेरणा धरणातून धाराशिव शहराला पाणीपुरवठा लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना देण्यात आल्या. सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागू नयेत, यासाठी कामात कोणतीही दिरंगाई होऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले.
शहरातील नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अटल अमृत-२ योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे योजनेचे काम वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याला प्राधान्य देण्याची भूमिका या वेळी मांडण्यात आली.
या पाहणीवेळी पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित मुंढे, विद्युत अभियंता सिद्धार्थ मोरे, ठेकेदार राजाभाऊ पवार, संजय मोरे आणि कन्सल्टंट सतीश राठोड उपस्थित होते.




