दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी दौरा
मेडसिंगा – अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, शेतीचे नुकसान आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न अशा अनेक संकटांचा सामना करणाऱ्या मेडसिंगा गावाची घाटकोपरचे आमदार पराग शहा यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी गावातील परिस्थिती जाणून घेतली. गावाच्या विकासासाठी विशेष पुढाकार घेण्याची मागणी करत ग्रामस्थांनी ‘मेडसिंगा गाव दत्तक घ्या’, अशी भावनिक साद आमदार शहा यांना घातली. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यात हे मोडसिंगा गाव आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर आणि तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या या दौऱ्यात ग्रामस्थांनी गावातील पाणीटंचाई आणि शेतीसमोरील अडचणी मांडल्या. पावसाअभावी शेतीचे नुकसान होत असून पशुपालन व्यवसायही अडचणीत आला आहे. त्यामुळे पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि गरज भासल्यास चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.
गावातील पाणीप्रश्न केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी सुटणार नसल्याने जलसंधारणाची कामे हाती घेण्यावर ग्रामस्थांनी भर दिला. गावातील नाल्यांचे सरळीकरण व खोलीकरण, तलावांमधील गाळ काढणे, जल साठवण क्षमता वाढवणे आणि पावसाचे पाणी अडवण्यासाठी आवश्यक कामे करण्याची मागणी निवेदनांद्वारे करण्यात आली.
ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्यानंतर आमदार पराग शहा यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची भूमिका मांडली. चारा-पाणी, जलसंधारण आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी नैराश्याला बळी न पडता धैर्य राखावे. शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि संकटग्रस्त कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून समन्वय साधण्याची भूमिका स्पष्ट केली. शासकीय मदतीसोबतच सामाजिक संस्था आणि सेवाभावी संघटनांनीही पुढे येऊन गरजू कुटुंबांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, मेडसिंगा गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी केलेली दत्तक घेण्याची मागणी आणि विविध निवेदनांमधून मांडलेले प्रश्न आता प्रत्यक्षात कितपत मार्गी लागतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुष्काळी संकटातून गावाला बाहेर काढण्यासाठी चारा-पाणी, जलसंधारण आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी एस. एस. कांबळे, कृषी सहाय्यक आनंद जाधव, ग्राम महसूल अधिकारी अरविंद पवार, माजी सरपंच अनुरथ दुधभाते यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरजू रुग्णाला आमदारांनी केली आर्थिक मदत
गावाची पाहणी करून परतत असताना आमदार पराग शहा यांच्या निदर्शनास एका गरजू रुग्णाची अडचण आली. त्या रुग्णाच्या आर्थिक तसंच वैद्यकीय परिस्थितीची संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी वाहनांचा ताफा थांबवून संबंधित रुग्णाची भेट घेतली आणि तातडीने आर्थिक मदत केली. दौऱ्यादरम्यान घडलेल्या या घटनेची उपस्थितांमध्ये चर्चा झाली.






