हेक्टरी ३० टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित
दुष्काळात पशुधनाला ३००० टन चारा अन् शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा पर्याय : आ. राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने राघुचीवाडी येथे महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात राघुचीवाडी शिवारातील तब्बल २५० एकर क्षेत्रावर चारा लागवड सुरू करण्यात आली आहे. यातून अंदाजे ३००० टन चारा उत्पादन अपेक्षित आहे. यासाठी परिसरातील १६० शेतकरी बांधवांना एसएस फीड जवार (कडवळ) एकूण एक हजार किलो बियाणे मोफत वितरित करण्यात आले आहे. यातून हेक्टरी सुमारे ३० टन प्रमाणे ३००० टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित असून, दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढण्यासोबतच शेतकरी बांधवांसाठी उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून, आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा योग्य विनियोग करून चारा उत्पादन वाढविण्याचा विचार पुढे आला. धाराशिव शहरातील सांडपाणी भोगावती नदीच्या माध्यमातून राघुचीवाडी तलावात जमा होते. या तलावातील उपलब्ध पाण्याचा उपयोग चारा निर्मितीसाठी करता येऊ शकतो अशी संकल्पना आपण या परिसरातील शेतकरी बांधवांसमोर मांडली असता त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तलावातील पाणीउपसा बंद करण्यात आल्याने शेतीसाठी या पाण्याचा वापर करता येत नव्हता त्यानुसार आपण जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक परवानगी देण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार पाणीउपसा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर शेतकरी बांधवांना बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आणि शनिवारी चारा लागवडीचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
राघुचीवाडी तलावातील उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून चारा उत्पादन करण्याचा हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्यानुसारच सुमारे २५० एकर क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. आता पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष लागवड सुरू झाली आहे. या प्रयोगाला यश मिळाल्यास जिल्ह्यातील अन्य भागांतही उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करून चारा उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम दिशादर्शक ठरू शकतो. दरम्यान, चारा लागवडीसाठी पाणीउपसा सुरू करण्याची परवानगी मिळवून दिल्याबद्दल, तसेच बियाण्यांचे मोफत वाटप करून लागवडीला प्रोत्साहन दिल्याबद्दल राघुचीवाडी परिसरातील १६० शेतकरी बांधवांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आभार मानले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे चारा ज्वारीच्या एका लागवडीतून तीन वेळा चारा कापणी करता येणार आहे. पेरणीनंतर साधारणतः ५५ दिवसांनी पहिली कापणी करता येईल. त्यानंतर प्रत्येकी ४० दिवसांच्या अंतराने दुसरी आणि तिसरी कापणी घेता येणार आहे. त्यामुळे एकाच वेळी उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता पुढील काही महिने हिरव्या चाऱ्याचा पुरवठा सुरू ठेवण्यास मदत होणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
हमीभावाने चारा खरेदी; शेतकऱ्यांना उत्पन्नाचा पर्याय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारा टंचाईच्या अनुषंगाने उत्पादित होणारा चारा राज्य सरकारकडून हमीभावाने खरेदी करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने शेतकरी बांधवांना याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे चारा लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवांना बाजारपेठेची चिंता न करता उत्पादन घेता येईल. एकीकडे दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांना आवश्यक चारा उपलब्ध होईल, तर दुसरीकडे चारा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा सक्षम पर्याय मिळणार आहे. विशेषतः खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना उपलब्ध पाण्याच्या आधारे अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची संधी या उपक्रमातून निर्माण होत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


