श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाची गर्दीत हरवलेली, १९ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेली पिशवी मंदिर सुरक्षारक्षकाने प्रामाणिकपणे परत केल्याची घटना घडली आहे. तुकाराम घोरपडे असे या प्रामाणिक सुरक्षारक्षकाचे नाव असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.(Honesty of security guard in Tulja Bhavani temple)
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील कोकलगाव येथील रहिवासी असलेल्या कलावती शिवाजी केदारी या बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. गर्दी असल्याने त्यांची पैशांची पिशवी कुठेतरी पडली. दरम्यान, मंदिर परिसरात गस्त घालत असलेले SISPL कंपनीचे सुरक्षारक्षक तुकाराम घोरपडे यांना ही पिशवी सापडली.
घोरपडे यांनी तात्काळ पिशवी दर्शन मंडप नियंत्रण कक्षात जमा केली. त्यानंतर ओळख पटवून ती कलावती केदारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. पिशवीमध्ये १९ हजार ६७७ रुपये रोख रक्कम होती. आपली हरवलेली पिशवी आणि त्यातील रक्कम सुखरूप परत मिळाल्याने केदारी यांनी समाधान व्यक्त करत घोरपडे यांचे आभार मानले. यावेळी मंदिर सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, फिल्ड ऑफिसर बिभीषण माने, सुरक्षा निरीक्षक अक्षय अनिल घुगे, सुरक्षा निरीक्षक योगेश फडके व इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.








