धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली आयटीआयची जागा तातडीने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा शासन आदेश ७ ऑक्टोबर रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनानुसार शासकीय आयटीआयची सहा हेक्टर ६२ आर जागा हस्तांतरित केली जाणार आहे. त्यामुळे १०० प्रवेश क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० रुग्णघाटांच्या रुग्णालयासह अद्ययावत वैद्यकीय संकुल तसेच शासकीय आयटीआयच्या नवीन इमारत उभारण्याचा मार्गही आता मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.(MLA – Ranajagjitsinha Patil)
७ ऑक्टोबर रोजी शासन आदेश निर्गमित
धाराशिव येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ४३० खाटांचे रूग्णालय व इतर अनुषंगिक इमारतींसह अद्ययावत वैद्यकीय संकुल उभारण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समितीने जानेवारीमध्ये अनुमती दिलेली आहे. त्यानुसार ४०३.८९ कोटी रुपयांच्या बांधकाम अंदाजपत्रकासही प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतलेल्या निर्णयानुसार शहरातील जलसंपदा व कौशल्य विकास विभागाची मिळून १२ हेक्टर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.शासकीय आयटीआयच्या सातबाऱ्यावर एकूण १२ हेक्टर क्षेत्र आहे. मात्र त्यातील १ हेक्टर ३८ आर एवढे क्षेत्र राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या संस्थेकडे १० हेक्टर ६२ आर एवढे क्षेत्र उपलब्ध आहे. शासकीय औद्योगिक संस्था धाराशिव यांची मान्यता अबाधित राखण्यासाठी उपलब्ध असलेल्या १० हेक्टर ६२ आर क्षेत्रापैकी ४ हेक्टर जागा शासकीय औद्योगिक संस्थेकडेच ठेवण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त उपल्ब्ध राहिलेले ६ हेक्टर ६२ आर एवढे क्षेत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवार ७ ऑक्टोबर रोजी शासन आदेश निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
त्यामुळे सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शासकीय आयटीआय आणि जलसंपदा विभागाच्या जागेत अद्ययावत वैद्यकीय संकुल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. वैद्यकिय शाखेशी निगडीत असलेले दंत महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, भौतिकोपचार शास्त्र, फार्मसी यासारखे अभ्यासक्रमही याठिकाणी सुरू केले जाणार आहेत. या शैक्षणिक संकुलाच्या बांधकामासाठी राज्य सरकारने ४०३ कोटी ८९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. या निधीतून आठ लाख २६ हजार चौरस फुट क्षेत्रावर बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये १०० विद्यार्थी क्षमता असणार्या मेडिकल कॉलेजची भव्य इमारत, ४३० खाटांचे रुग्णालय, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, अधिष्ठाता यांचे निवास, कर्मचार्यांसाठी निवासी घरे, विश्रामगृह, सुरक्षारक्षक कक्ष आदींचा समावेश असणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
आयटीआयच्या संकुलासाठी ६० कोटींचा निधी
जलसंपदा विभाग आणि शासकीय आयटीआयची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे येथील शासकीय आयटीआयकडे उपलब्ध राहिलेल्या ४ हेक्टर जमिनीवर कौशल्य आणि उद्योजकता विकास वाढीस लागण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनचे अद्ययावत संकुल बांधले जाणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ६० कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. आयटीआयच्या नवीन संकुलासाठी दिल्या जाणाऱ्या ६० कोटी निधीतून जवळपास एक लाख चौरस फुटाचे बांधकाम प्रस्तावित आहे.विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन बांधकाम पूर्ण होईपर्यंत सध्या ज्या ठिकाणी आयटीआय सुरू आहेत तिथेच चालू ठेवण्यात येणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.








