अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात पिकांसह पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. पूल खराब झाले आहे, वीज पुरवठा करणारे पोल, डीपी कोसळ ली आहे, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा लाईन विस्कळीत झाल्या आहेत. अशा पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. हि मदत मिळवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावाने अतिनिकडीच्या कामांचा प्राधान्यक्रम ग्रामसभेत ठराव करावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. (MLA Ranajagjitsinha patil)
तातडीच्या बाबींसाठी जिल्हा नियोजन समितीच्या २०२५-२६ या वर्षीचा निधी उपलब्ध करून देणार
आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. प्रत्येक गावात पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने गावातील नागरिकांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक गावाने गावात ग्रामसभा घ्यावी. या ग्रामसभेत जे नुकसान झाले आहे त्यातील अतिमहात्वाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याचा ठराव ग्रामसभेत करून घ्यावा. या ठरावाला कायदेशीर महत्व देखील प्राप्त होते. परिणामी शासनाची पायाभूत सुविधांच्या बाबतीतील मदत प्रत्येक गावाला मिळवून प्राधान्यक्रमानुसार कामे मार्गी लावणे सहज शक्य होईल. तातडीच्या बाबींसाठी सण जिल्हा नियोजन समितीच्या २०२५-२६ चा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
गावागावात पंचनाम्याचे वाचन
बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदेकडून पायाभूत सुविधांच्या नुकसानीच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामसभेत ठराव करतानाचा गावागावात पंचनाम्यांचे वाचन केले जातील असेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.
सरकारने मदत उपलब्ध करून दिली; आता अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपली.
अतिवृष्टीच्या या अभूतपूर्व नुकसानीसाठी सरकारने अभूतपूर्व अशी मदत जाहीर केली आहे. आता हि मदत मिळवण्यासाठी अंमलबजावणी करण्याची जवाबदारी आपली आहे. दगावलेली, वाहून गेलेली जनावरं यांच्या बाबतीत जी मर्यादा होती ती आता सरकारने काढली आहे. परिणामी जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे.
खरवडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे सुरु आहेत आणि ते सुरु राहतील. हळूहळू पाणी ओसरत आहे. जमीन उघडी पडते आहे. खरवडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे व्यवस्थित करून घ्यावे, पिक कापणी प्रयोग अतिशय काळजीपूर्वक करून घ्यावे. मिळणारी मदत हि योग्य प्रमाणात सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे मदत मिळवण्यासाठी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपली आहे अशी माहिती राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.








