धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मागील चार दिवसांपासून शेतकरी बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यातील एक आंदोलक महिला आज दिनांक १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झाडावर आणि प्रवेशद्वारावर चढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांना प्रवेशद्वारावरून आणि झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विनंतीला मान देत आंदोलक महिला तातडीने झाडावरून खाली उतरल्या.(MLA Ranajagjitsinha Patil)
दरम्यान राणाजगजितसिंह पाटील यांनी आंदोलनस्थळी आमरण उपोषणात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या सगळ्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार पाटील म्हणाले, बहुतांश मागण्या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत. उर्वरित काही मागण्यांवर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. मंगळवारपर्यंत आंदोलन स्थगित करावे, अशी विनंतीही आमदार पाटील यांनी आंदोलकांना केली. तसेच शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मदतीची इत्यंभूत माहिती त्यांनी आंदोलकांना दिली. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सरसकट मदत मिळेपर्यंत आपण आग्रही पाठपुरावा करणार असल्याचा शब्दही यावेळी आमदार पाटील यांनी उपस्थितांना दिला. उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीबाबत दक्ष रहावे अशा सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.








