संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादी पूर्णपणे अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठी मोहीम हाती घेणार आहे. या मोहिमेअंतर्गत, मतदार यादीतून मयत झालेल्या मतदारांची नावे वगळली जातील, जेणेकरून यादीतील ‘बोगस’ मतदारांची संख्या कमी करता येईल. ही संपूर्ण तपासणी मोहीम निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.(Voter Verification)
डेटा एकत्रीकरणातून यादीची शुद्धता
मतदार यादीची अचूकता वाढवण्यासाठी आयोगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा थेट निवडणूक यंत्रणेशी जोडला जाणार आहे. याशिवाय, आरजीआय (RGI – Registrar General of India) आणि महापालिकांचा डेटा देखील आयोगाला उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील तीन स्वराज्य संस्थांमधील डेटाचा वापरही या तपासणीसाठी केला जाईल. या डेटाच्या आधारावर मयत व्यक्तींची नावे स्वयंचलित पद्धतीने (Automatically) मतदार यादीतून वगळली जातील.
बिहारच्या ‘SIR’ मॉडेलचा आधार
बोगस मतदारांना बाहेर काढण्यासाठी आयोग स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) या विशेष तपासणी मोहिमेवर भर देत आहे. अशा प्रकारची मोहीम २५ जून २०२५ पासून बिहारमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आली होती, ज्याची अंतिम यादी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात आली. याच धर्तीवर संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रातही ही मोहीम राबवली जात आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष आणि विश्वसनीय मतदार यादीच्या आधारे पार पाडण्यास मदत होणार आहे.









