भूम तालुक्यातील देवळाली येथील गणेश दगडू तांबे (वय ३८) हा तरुण मंगळवारी (दि.२३) गावाजवळील नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता. या तरुणाचा मृतदेह तीन दिवसानंतर शुक्रवारी (दि.२६) परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील स्मशानभूमी शेजारील नदीपात्राच्या कडेला झाडीमध्ये आढळून आला आहे. (Body of young man swept away in flood found after 3 days)
गणेश तांबे हा तरुण देवळाली येथे भूमकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावाजवळ असणाऱ्या नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने वाहून गेला होता. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती. या युवकाचा शोध एनडीआरएफची टीम तसेच स्थानिक युवकांनी घेतला. परंतु, गणेश सापडला नाही.
दरम्यान, शुक्रवारी (दि.२६) परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील स्मशानभूमी शेजारी नदीच्या कडेला एक मृतदेह असल्याची माहिती समजली. त्या माहितीवरून गणेश तांबे याचे कुटुंबीय व गावातील काही युवक यांनी सरणवाडी येथे धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यानंतर तो गणेशच असल्याची ओळख पटली. गणेशचा मृतदेह सापडत नसल्याने त्याला शोधण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. पाण्याचा प्रवाह व पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.








