महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानुसार लवकरच राज्य सरकार या मदतीसाठी एक प्रस्ताव केंद्राला सादर करणार आहे, त्यानंतर केंद्राची मदत राज्याला मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सोबतच ८- ९ ऑक्टोबरदरम्यान नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.(Maharashtra flood victims will get help from the Center)
दिल्लीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते. ते योग्य वेळी पूर्ण करू. त्यावर आमची एक समिती काम करत आहे. शेतकऱ्यांना आता खात्यात मदत करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी, पूरस्थिती आणि त्यामुळे झालेले शेतकर्यांचे नुकसान याबद्दल माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीचे एक निवेदनही दिले. त्यावर महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या पाठिशी केंद्र खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. यासह महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहीसर येथील भारतीय विमानतळ प्राधीकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार करीत असलेले उपाय इत्यादींबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केली.









