अतिवृष्टीने राज्यभर धुमाकूळ घातला आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जमीन खरवडून गेली असून अनेक ठिकाणी गुरं ढोरं वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक ठिकाणी पुराचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे, हतबल झाला आहे. शासनाच्या वतीने वेगळ्या मदतीची तरतूद देखील करण्यात आली आहे. गुरं वाहून गेल्याची अर्थात जीवित व वित्त हानी झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा स्तरावरून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. या सर्व परिस्थितीत योग्य ती मदत मिळण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे पिक विमा. (Pik kapani prayog)
या संकट समयी शेतकऱ्यांनी खचून न जाता आता शासनाची मदत मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे गरजेचे आहे. उध्वस्त झालेल्या पिकांचे सरकार दरबारी पंचनामे करून घ्यावे. पिक कापणी प्रयोग अतिशय दक्षतेने करवून घेतले पाहिजेत. काळजीपूर्वक पिक कापणीचा फायदा शेतकऱ्यांना भरघोस पिक विम्याची रक्कम मिळवून देईल. पिक कापणी संदर्भात अनेकांचे समज – गैरसमज आहेत. पिक कापणीची सविस्तर प्रक्रिया खालीलप्रमाणे-
पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया
एकूण १२ प्रयोग: एका महसूल मंडळामध्ये एकूण १२ पीक कापणी प्रयोग घेतले जातील.ठराविक क्षेत्राची निवड: प्रयोगासाठी ठराविक क्षेत्रातील पीक कापले जाते.
उत्पादनाचे मापन: कापलेल्या पिकावरून मिळणारे उत्पादन नोंदवले जाते. त्यावरून मंडळाच्या एकूण उत्पादनाचा अंदाज काढला जातो.
उंबरठा उत्पादनाशी तुलना: हा अंदाज गेल्या काही वर्षातील उंबरठा उत्पादन (साधारण उत्पन्न) यापेक्षा कमी असल्यास, त्यानुसार विमा भरपाईची रक्कम ठरवली जाते
सद्यस्थितीत अनेक ठिकाणी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले असल्याने, पीक कापणी प्रयोगांमध्ये उत्पादन ‘शून्य’ येणे अपेक्षित आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
विमा भरपाई कशी ठरते?
उदा. सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टर ५४,००० रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. ही रक्कम दोन मुख्य घटकांवर अवलंबून असते:
घटक टक्केवारी रक्कम कशावर अवलंबून आहे?
पीक कापणी प्रयोग ५०% ₹ २७,००० प्रत्यक्ष शेतात होणाऱ्या पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावर.
सॅटेलाईट इमेजेस ५०% ₹ २७,००० सॅटेलाईटद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमधून झालेल्या नुकसानीच्या विश्लेषणावर.
याचा अर्थ, पीक कापणी प्रयोगांमध्ये अचूक नोंद झाल्यास शेतकऱ्यांना किमान २७ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त विमा रक्कम मिळू शकते.
शेतकऱ्यांनी घेण्याची काळजी :
प्रयोगाच्या प्रक्रियेकडे लक्ष द्या: आपल्या क्षेत्रात पीक कापणी प्रयोग सुरू असताना प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेकडे बारकाईने निरीक्षण ठेवा.
वस्तुस्थितीचे अवलोकन: प्रत्यक्ष परिणाम पाहून वस्तुस्थितीची नोंद घ्या. कोणतीही चुकीची नोंद किंवा त्रुटी दिसल्यास संबंधित अधिकारी/कंपनीच्या प्रतिनिधींना लगेच कळवा.
अडचण दाखवा: प्रयोगाच्या वेळी कोणत्याही अडचणी, त्रुटी, किंवा गैरसमज असेल, तर त्वरित संबंधितांच्या लक्षात आणून द्या.
प्रकियेत सहभाग: यंत्रणेतील प्रतिनिधी (विमा कंपनी, कृषी अधिकारी) यांच्याशी आवश्यक तितका समन्वय साधा. क्षेत्रातील प्रक्रिया व्यवस्थित, पारदर्शीपणे होईल याची खात्री करा.








