धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिमुसळधार पाऊसाने शेतकऱ्यांचे अतिप्रचंड नुकसान झाले आहे. अनेक नदी, ओढ्यांना पूर आल्याने गावांमध्ये पाणी शिरले असून गावांचा संपर्क तुटला आहे. अशा अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये जाऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांसह नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावे असे स्पष्ट आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (MLA Ranajagjitsinha Patil)
तुळजापूर तालुक्यातल्या काटी,सावरगाव, वडाळा शिवार, केमवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. काल रात्री ८ वाजेपासून या परीसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मातीही वाहून गेली आहे. झालेल्या सर्व नुकसानीचा आणि सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांशी चर्चा करत त्यांना धीर दिला. ज्या ठिकाणी पाणी पातळी वाढत आहे अशा नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांच्या बांधावर जात आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. तत्काळ पंचनामे करून मदत देण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पिकाचं नुकसान विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळेल परंतु प्रचंड पावसाने आणि अतिवेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेली आहे अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विशेष पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.








