धाराशिव येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांचे आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.पाठक यांनी दैनिक सकाळसह अन्य वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले होते. त्याचे अनेक सामाजिक विषयावर केलेले लिखाण राज्यभर गाजले होते, मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार अशी त्यांची ओळख आहे.(Senior Journalist Dilip Narikar)
त्यांची पत्रकारिता सर्वसमावेशक आणि निर्भीड होती. धाराशिव व परिसरातील घडामोडींवर त्यांची बारकाईने नजर होती. पत्रकारितेतील नव्या पिढीला ते बातमीतले विविध आयाम उलगडून सांगायचे, नवपत्रकारांना त्यांनी सखोल पत्रकारितेचे मार्गदर्शन वेळोवेळी केले. त्यांचा शब्दसाठा प्रचंड होता. सर्व अंगाने बातमीदारी करण्याची त्यांची स्वतंत्र शैली होती. त्यांच्या जाण्याने आपण अभ्यासू आणि जाणत्या पत्रकाराला मुकलो असा शोक धाराशिवच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून व्यक्त होत आहे.








