जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आणि एकूण आर्थिक विकासाला गती देण्याच्या अनुषंगाने ‘MahaSTRIDE’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत विविध उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या सहकार्याने ‘मित्र’ संस्थेमार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याची माहिती ‘मित्र’चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. (‘MahaSTRIDE’ Meeting Omarga)
MahaSTRIDE’ प्रकल्पाअंतर्गत उमरगा येथील बैठकीत त्यांनी या प्रकल्पाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी पाटील यांनी धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेऊन तहसील कार्यालय, उमरगा येथे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी जिल्ह्यातील विकास प्रकल्पांच्या आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या.
‘MahaSTRIDE’ प्रकल्पाचा उद्देश म्हणजे स्थानिक गरजा आणि बलस्थान ओळखून त्यानुसार विशिष्ट विकास आराखडे तयार करणे व त्यांची शाश्वत अंमलबजावणी करणे हा आहे. उमरगा व लोहारा तालुक्यांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या योजनांवर भर देऊन ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बैठकीत दिले..








