भारतानं 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया कप 2025 चं जेतेपद पटकावलं. रविवारी भारतीय संघान 7 सप्टेंबर रोजी राजगीर येथे कोरियावर 4-1 नं शानदार विजय मिळवला. दिलप्रीत सिंगनं दोन गोल केले, तर सुखजीत सिंग आणि अमित रोहिदास यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताला विश्वचषक 2026 साठी पात्रता मिळवून दिली.(Hockey Asia Cup 2025)
दक्षिण कोरियावर विजय
भारतीय पुरुष हॉकी संघानं राजगीर, बिहार येथील राजगीर क्रीडा संकुलात आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात डिफेंडिंग चॅम्पियन दक्षिण कोरियावर 4-1 असा दमदार विजय मिळवला. या विजयासह भारतानं आपले चौथे आशिया कप जेतेपद पटकावलं. त्यामुळं भारत आता 2026 मध्ये नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे होणाऱ्या FIH हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरलाय. यापूर्वी भारतानं 2017 मध्ये ढाका येथे मलेशियाला हरवून हा किताब जिंकला होता.
दिलप्रीत सिंग सर्वोत्कृष्ट खेळाडू
भारताने सामन्याची सुरुवात धमाकेदार केली. सामन्याच्या पहिल्याच मिनिटात कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या शानदार पासवर सुखजीत सिंगनं 30 सेकंदातच गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दिलप्रीत सिंगनं 28व्या आणि 45व्या मिनिटाला दोन गोल करत भारताची आघाडी 3-0 अशी वाढवली. 50व्या मिनिटाला अमित रोहिदासनं पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत स्कोअर 4-0 केला. कोरियानं 51व्या मिनिटाला सन डैनच्या गोलनं एक गोल परत केला, पण भारतीय संरक्षणानं त्यांना पुनरागमनाची संधी दिली नाही. दिलप्रीत सिंगला त्याच्या उत्कृष्ट खेळासाठी सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं.
भारताच्या या विजयानं त्यांचा आशिया कपमधील दबदबा पुन्हा सिद्ध झाला. कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी संघाच्या एकजुटीचे आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याचे कौतुक केलंय. हा विजय भारताच्या हॉकीतील उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल मानलं जातंय.