सोलापूर-हैदराबाद महामार्गावर नळदुर्गजवळ ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार झाले. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हि दुर्दैवी घटना सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील (क्रमांक ६) येथून जवळच गुरुवारी (ता. चार) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.(Dharashiv Accident)
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादहून मुंबईकडे निघालेला ट्रक (टीएस १ यूबी ८६७६) व सोलापूरहून कलबुर्गीकडे निघालेल्या कारची (केए ४१ बी २६००) येथील साई प्लाझा हॉटेलजवळ समोरासमोर धडक झाली.त्यात कारमधील प्रीतम पांचाळ (वय २३, रा. आळंद-कर्नाटक) व रेवणसिद्ध निकुडुगी (२५, रा. कलबुर्गी-कर्नाटक) हे जागीच ठार झाले.मल्हार रामचकल्ला (२७), गिरजप्पा शरणम्मा (४०), पवन सागर (३५, सर्व कलबुर्गी) गंभीर जखमी झाले.
महामार्ग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमृता पटाईत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. हेड कॉन्स्टेबल खालील शेख तपास करीत आहेत.