दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्र येत पॅनल तयार केले. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढवलेली ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी महायुतीनेही मोर्चेबांधणी केली असून एकत्र येत सहकार समृद्धी पॅनलची निर्मिती केली आहे. (Thackeray brothers vs MahaYuti)
या पॅनलमध्ये भाजपा आमदार प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना, शिंदे गटाचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना, महेंद्र साळवे यांची बेस्ट एसी/एसटी/व्हीजेएनटी वेल्फेअर असोसिएशन आणि मनोज संसारे यांचा बहुजन संघ अशा पाच संघटनांचा समावेश आहे. या पाचही संघटनांनी सोसायटीत सत्ताधारी उबाठा सेनेच्या संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
समर्थ बेस्ट कामगार सेनेचे विलास पवार म्हणाले की, सुमारे ८४ वर्षांचा इतिहास असलेल्या या पतसंस्थेवर उबाठा सेनेचे मंडळ गेली ९ वर्षे कार्यरत होते. या काळात झालेल्या भ्रष्ट कारभारामुळे अनेक सभासदांनी राजीनामे दिले. परिणामी सभासद संख्या निम्म्यावर आली. तसेच अ श्रेणी असलेली सोसायटी मागील ४ वर्षांपासून ब श्रेणीत घसरली आहे.