उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे आलेल्या महाप्रलयामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या महाप्रलयात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 24 पर्यटक अडकले होते. गंगोत्री मार्गावर जात असताना त्यांच्या संपर्कात अडथळा आला होता. त्यामुळे गावात काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता समाधानाची बातमी समोर आली आहे. हे सर्व प्रवासी सुखरुप आहेत, अशी माहिती बस ड्रायव्हरने दिली आहे. (uttarakhand cloudburst rescue)
एकाच बॅचचे होते सर्वजण
उत्तराखंडमध्ये मंगळवारी म्हणजे ५ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाने थैमान घातलं. काही ठिकाणी ढगफुटी झाली आणि रस्ते, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. याच दरम्यान पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील 24 पर्यटकांचा ग्रुप गंगोत्री मार्गावर होता.या ग्रुपमध्ये भैरवनाथ विद्यालयातील 1990 च्या दहावी बॅचचे वर्गमित्र आणि मैत्रिणी होते. धार्मिक आणि पर्यटनाच्या उद्देशाने ते ऋषिकेश- गंगोत्रीला गेले होते. मात्र मंगळवारी रात्रीपासून त्यांच्याशी संपर्क तुटला आणि गावात चिंतेचे वातावरण निर्माण झालं. काहीजणांनी “आम्ही गंगोत्रीकडे निघालो आहोत” असा शेवटचा स्टेटस ठेवला होता.
त्तराखंडच्या डिझास्टर मॅनेजमेंट विभागाकडूनही मिळाली प्रवाशांची माहिती
या सर्वांचा काहीही संपर्क होत नसल्यानं गावात काळजीचं वातावरण होतं. मात्र बुधवारी रात्री सुखद बातमी आली. बस चालकाने थेट बस मालक रशीद खान यांच्याशी संपर्क साधून सर्व पर्यटक गंगोत्रीमध्ये सुरक्षित असल्याचं कळवलं. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने मोबाईल डिस्चार्ज झाले होते आणि त्यामुळे कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता, असे त्यांनी सांगितले. उत्तराखंडच्या डिझास्टर मॅनेजमेंट विभागाकडूनही या प्रवाशांची माहिती मिळाली असून, ते सर्व जण हिना चेक पोस्ट ओलांडून पुढे गेले आहेत आणि सध्या सुरक्षित आहेत.मुख्याध्यापक विठ्ठल खेडकर हेही या ग्रुपमध्ये होते. सुरक्षिततेची माहिती मिळताच गावात समाधानाचे वातावरण आहे.