मराठा समाजातील कार्यकर्ते सातत्याने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी याठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र 1 सप्टेंबर 2023 रोजी जवळपास 1500 पोलीस आणि एसआरपीएफच्या जवानांनी शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना अतिशय निर्दयी पद्धतीने मारहाण केली होती. अशी घटना 29 ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनामध्ये घडू नये, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.(Manoj jarange patil)
मनोज जरांगे पाटील धाराशिव जिल्हा दौऱ्यावर
मराठा समाजाच्या वतीने 29 तारखेला मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज (5 ऑगस्ट) धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज धाराशिव शहरामध्ये मनोज जरंगे पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीदरम्यान विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेऊन 29 ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एकदा आमची डोकी फुटली आहेत आणि अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाहीत. अंतरवालीतील आया बहिणींना दुःख सहन करावं लागलं, गुढघ्याचे ऑपरेशन झाले, मांड्यांला टाके लागलेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो की, पुन्हा अंतरवाली सराटीसारखी चूक करायची नाही आणि त्या भानगडीत पडायचं नाही.
मराठे सरकारचा मार निमुटपणे खाणार नाहीत.
मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, गोडी गुलाबीने तुम्हाला जे करायचं ते करा, त्यावेळेस घडलं ते घडलं. आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. ही धमकी नाही तुम्हाला मी हे समजून सांगतो आहे. कारण तुम्हाला ती खोड आहे. तुम्हाला जनतेची माया नाही. तुम्हाला आई-बहीण कळत नाही, लेकरू-बाळं करत नाही. त्यामुळे आई-बहीण आणि पोरांवर हात पडला तर मराठे कुठल्याही थराला जातील एवढे लक्षात ठेवा. कारण मराठे पुन्हा पुन्हा मार खायला मोकळे नाहीत, हेही लक्षात ठेवा. आता चुकीला माफी नाही. आता मराठे सरकारचा मार निमुटपणे खाणार नाहीत. त्यामुळे 29 ऑगस्टच्या आंदोलनात जर काही चूक झाली तर त्याची किंमत तुमच्यासह (महायुती सरकार) पंतप्रधान मोदींना सुद्धा मोजावी लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.