शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकाच वेळी देहदान आणि नेत्रदान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच देहदान झाले आहे.जगदुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या प्रेरणेतून हे देहदान झाले असून, ७० वर्षीय महिलेचे हे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास करण्यात आले आहे.(1st Body Donation Dharashiv)
पाप पुण्याच्या पलीकडे जात देह्दान करून समाजापुढे ठेवला आदर्श
धाराशिव शहरातील मंगल बाबुराव मुंडे (७०) या मागील काही दिवसांपासून किरकोळ आजाराने त्रस्त होत्या. त्यांचा सांभाळ दीपा कल्याण जाधव या करत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना धाराशिव शहरातील निरामय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी (दि.२२) सकाळी नऊ वाजता कार्डियाक अरेस्ट मुळे त्यांचे दुःखद निधन झाले, त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच त्यांच्या मुलीने दीपा कल्याण जाधव यांनी आईच्या मृतदेहाचे देहदान करावे अशी इच्छा व्यक्त केली.
दीपा जाधव या जगद्रुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम या संस्थेशी संबंधित धार्मिक कार्य करतात. याच संस्थेच्या मदतीने त्यांनी आईचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय सोपा नव्हता. नातलग, पाहणे यांना याबद्दल माहिती दिल्यानंतर काही जणांनी या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी याला विरोध दर्शविला. परंतु, जगद्वरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थेच्या साधकांनी या निर्णयात त्यांची मदत केली. जवळच्या काही नातलगांनी केलेल्या विरोधाला संवादातून मार्ग काढत सर्वांच्या सहमतीने अखेर देहदानाचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यासंबंधीची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांना देण्यात आली. डॉ. चौहान यांनी तात्काळ शरीररचनाशास्त्र विभागाच्या डॉ. स्वाती पांढरे यांना यासंबंधी सूचना दिली आणि देहदानाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी देहदानासोबतच नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. दीपा जाधव यांनी हा निर्णय घेऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.