धाराशिव : तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजीनियरिंग विभागाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. विभागाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने तसेच सर्व विभाग प्रमुख या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. एस. एम. पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली. व्यासपीठावरील मान्यवर, सर्व शिक्षक वृंद आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. विविध उपक्रम, खेळ आणि शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. यावेळी वैष्णवी काळे आणि समर्थ मनाले यांनी सुत्रसंचालन केले.
याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषण करताना प्राचार्य डॉ. माने यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन नोकरीसाठी उपलब्ध संधी विषयी माहिती दिली. विभाग प्रमुख प्रा. एस. एम. पवार यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात चालू दोन वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, पीडब्ल्यूडी, जिल्हा परिषद, पब्लिक वर्क डिपार्टमेंट, सेंट्रल रेल्वे, टाऊन प्लॅनिंग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या शासकीय सेवेत निवड झालेल्या व त्याचबरोबर टीसीएस सारख्या आयटी कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा उल्लेख करत यावर्षी पास आऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी समयोचित मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाचे आणि सर्व स्टाफचे त्यांच्या जडणघडणीत हातभार लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सिव्हिल विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.