मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु आहेत. येत्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याचे अंदाज वर्तवले जात असताना हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधु एकत्र येणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.
५ जुलै रोजी मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. शिवसेना ठाकरे गटाने देखील मराठी भाषाप्रेमींच्या ७ जुलै रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. याबाबत संजय राऊत यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झाल्यानंतर दोघांनीही एकाच दिवशी मोर्चा काढण्याबाबत होकार दिल्याचं सांगितलं.
संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी ७ जुलै रोजीच्या मोर्चाला पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी ६ जुलैला मोर्चा काढण्याचं जाहीर केलं. आम्हाला त्याबाबत कल्पना नव्हती. दोन्ही घोषणा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मला फोन केला. ते म्हणाले, “तुमच्या मोर्चाची मला कल्पना नव्हती. मात्र, मराठी भाषेसाठी दोन-दोन मोर्चे निघणं बरं दिसत नाही. एकत्र आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसू शकतो.” मी त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आणि त्यांनी आढेवेढे न घेता म्हणाले की, “माझीही वेगळ्या मोर्चाची भूमिका नाही. मात्र ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने आंदोलन लोकांपर्यंत पोचवणं कठीण आहे.” राज ठाकरे यांना आम्ही ५ जुलै तारीख सुचवली आणि त्यावर राज ठाकरेंनी सहकाऱ्यांशी बोलून होकार दिला. कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय हा मोर्चा असेल.”
त्रिभाषा सुत्राच्या नावाने महाराष्ट्रात हिंदी सक्ती केली जात असल्याचा आरोप होत आहे. शालेय शिक्षणात हिंदी सक्ती खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे.