अतिवृष्टीमुळे राज्यात बळीराजाचे अतोनात हाल झाले आहेत. सततच्या पावसाने पिके उध्वस्त झाली आहेत.अशातच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना १८९ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. सरकारने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
जिल्ह्यात जुलै ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत २ लाख ३४ हजार ९५५ शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. २ लाख २२ हजार ९७५.४८ इतके क्षेत्र बाधित झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना १८९ कोटी रुपयांची मदत सरकारने उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना लवकरच हा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.








