तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविक महिलेचा हरवलेला मोबाईल मंदिरातील सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे परत मिळाला.
देवीच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या ओटीच्या पिशवीत मंदिरातील सुरक्षारक्षक अमोल चव्हाण यांना एक मोबाईल आढळून आला. त्यांनी तत्काळ सुरक्षा पर्यवेक्षक योगेश फडके यांच्या माध्यमातून हा मोबाईल दर्शन मंडप नियंत्रण कक्षात जमा केला.
दरम्यान, आपला मोबाईल हरवल्याचे लक्षात आल्यानंतर कल्याणी किसन पवार (रा. धुळदेव, ता. फलटण) यांनी दर्शन मंडप नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. आवश्यक ती खातरजमा केल्यानंतर संबंधित मोबाईल त्यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांचा हरवलेला मोबाईल त्यांना सुपूर्द केला.



