मराठा साम्राज्याचे एक महत्त्वाचे सेनापती आणि नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले यांची तलवार लंडनहून पुन्हा महाराष्ट्रात परत आणण्यात आली आहे. महायुती सरकारने हा ऐतिहासिक वारसा परत आणण्यासाठी मोठी मोहीम राबवली होती.(Raghuji Bhosale Sword)
काही महिन्यांपूर्वी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात आणली होती. त्यानंतर आता मराठा साम्राज्याच्या काळातील ही तलवार आणली आहे.ही 18 व्या शतकातील तलवार सोथबीजच्या लिलावातून 47.15 लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आली. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात तिचे अनावरण होणार आहे, अशी माहिती शेलार यांच्या कार्यालयाने दिली. या कार्यक्रमाला रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले देखील उपस्थित राहणार आहेत.
तलवारीची वैशिष्ट्ये
रघुजी भोसले यांची ही तलवार ‘फिरंगी तलवार’ म्हणून ओळखली जाते. तिचे पाते युरोपियन बनावटीचे असून, मुठ भारतीय पद्धतीची आहे. मुठीवर सोन्याची कलाकुसर आहे. तलवारीच्या पात्यावर देवनागरी लिपीत “श्रीमंत रघुजी भोसले सेनासाहेब सुभा फिरंग” असे कोरलेले आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी रघुजी भोसले यांना ‘सेनासाहेब सुभा’ ही पदवी दिली होती. ही तलवार ऐतिहासिक आणि दुर्मिळ मानली जाते, कारण त्यावर दोन्ही बाजुंनी कलाकुसर आणि मालकाचे नाव कोरलेले आहे.
इतर ऐतिहासिक वस्तू परत आणण्यासाठी प्रयत्न
रघुजी भोसले यांची तलवार परत आणणे, हे महायुती सरकारने मराठा साम्राज्याचा वारसा जपण्यासाठी उचललेले एक मोठे पाऊल आहे. याआधी गेल्या वर्षी तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराजांचे ‘वाघनख’ लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून महाराष्ट्रात परत आणले होते.
याशिवाय, राज्य सरकार शिवाजी महाराजांची ‘जगदंबा तलवार’ परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच, ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्यासाठी आग्रा येथे शिवाजी महाराजांच्या अटकेच्या ठिकाणाची जागा विकत घेण्याचाही सरकारचा विचार आहे.