शिक्षण मंत्रालयाच्या अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ चा राष्ट्रव्यापी शुभारंभ करण्यात आला आहे. हा उपक्रम भारतातील विद्यार्थ्यांसाठीचे सर्वात मोठे नवोपक्रम आंदोलन म्हणून ओळखला जात आहे. इयत्ता ६वी ते १२वीमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमाचा उद्देश, तरुण मनांना सर्जनशीलता आणि सांघिक कार्याद्वारे वास्तविक जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रेरित करणे असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.(Viksit Bharat Buildathon)
चार मुख्य संकल्पनांवर विद्यार्थी मांडणार कल्पना
‘विकसित भारत बिल्डथॉन’मध्ये सहभागी होणारे विद्यार्थी खालील चार मुख्य संकल्पनांवर आधारित कल्पना आणि प्रोटोटाइप (नमुना) विकसित करतील:
- आत्मनिर्भर भारत – स्वयंपूर्ण प्रणाली आणि उपाययोजनांची निर्मिती करणे.
- स्वदेशी – देशांतर्गत नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे.
- व्होकल फॉर लोकल – स्थानिक उत्पादने, कला आणि संसाधनांना चालना देणे.
- समृद्धी – भरभराट आणि शाश्वत विकासाचा मार्ग मोकळा करणे.
अनुभवात्मक शिक्षणाचे व्यासपीठ
शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून अनुभवात्मक शिक्षणाचे एक प्रभावी व्यासपीठ आहे.यातून विद्यार्थ्यांना वर्गातील ज्ञान प्रत्यक्ष जगाशी जोडून समस्या सोडवण्याचे, नवकल्पना सुचवण्याचे आणि सहकार्याचे कौशल्य विकसित करण्याची संधी मिळेल.हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत असून कृती आणि प्रकल्प-आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणार आहे.
विकसित भारत बिल्डथॉन २०२५ उपक्रम कसा राबवला जाणार?
- शाळांनी त्यांच्या विद्यार्थी संघांची नोंदणी २३ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन करणे आवश्यक आहे.
- प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोटोटाइपचे फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात प्रवेशिका सादर करावी लागेल.
- १३ ऑक्टोबर २०२५ – सर्व शाळांमध्ये ‘लाइव्ह बिल्डथॉन’
- १४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ – प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत
- नोव्हेंबर २०२५ – प्रवेशिकांचे मूल्यांकन
- डिसेंबर २०२५ – विजेत्यांची घोषणा हाेणार.
निवड झालेल्या संघांना आकर्षक बक्षिसे
निवड झालेल्या संघांना आकर्षक बक्षिसे मिळतील. त्यांच्या कल्पनांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी त्यांना दीर्घकालीन मार्गदर्शन आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे सहकार्यही मिळेल.प्रत्येक शाळा आणि विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित आहेत.हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता जागवण्यासाठी, नवनिर्मितीचा सन्मान करण्यासाठी आणि भविष्यातील नवसंशोधकांना घडवण्यासाठी एका चळवळीचे स्वरूप धारण करत आहे.
‘विकसित भारत बिल्डथॉन’साठी नोंदणी कशी कराल?
- ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’मध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट vbb.mic.gov.in ला भेट द्यावी.
- वेबसाइटवर ‘Register’ टॅबवर क्लिक करा.
- नवीन पेजवर शाळेचा UDISE कोड भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.









