दिवाळी आणि नाताळ या सणासुदीच्या काळात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरात दाखल होतात. भाविकांच्या वाढत्या गर्दीचे सुयोग्य नियोजन आणि दर्शन व्यवस्थापन सुरळीत राहावे, यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(Tulja Bhavani Temple tuljapur)
संस्थानच्या निर्णयानुसार दिवाळी ते नाताळ या काळात दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी तुळजाभवानी मंदिर मध्यरात्री १ वाजता उघडले जाणार आहे. पहाटे एक वाजता चरण तिर्थ होणार असून सहा वाजल्यापासून अभिषेक पुजा पार पडणार आहे अभिषेक पुजेदरम्यान पेड दर्शन बंद असणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून (मंगळवारपासून) करण्यात येणार आहे. मंदिरात दरवर्षी दिवाळी ते नाताळदरम्यान लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने दर्शन रांगा लांबतात आणि गर्दीचे नियंत्रण आव्हानात्मक ठरते. या पार्श्वभूमीवर मंदिर लवकर उघडण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांना अधिक सुलभतेने आणि आरामदायीपणे दर्शन घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मंदिर संस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून दर्शन व्यवस्थापनात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. सुरक्षा, स्वच्छता आणि सुविधा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे.” या निर्णयामुळे भाविकांना मध्यरात्रीपासूनच दर्शन घेण्याची संधी मिळणार असून, तुळजापूर शहरात धार्मिक वातावरण अधिक उत्साही होणार आहे.







