आता विद्यार्थ्यांना विज्ञान वारीतून ‘नासा’ला भेट देता येणार आहे. मुंबईसह राज्यभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असून, मुख्यमंत्री विज्ञान वारी योजनेंतर्गत निवड झालेल्या १५१ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित नॅशनल ॲरोमॅटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) या वैज्ञानिक संशोधन केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे.(Students have chance to visit NASA)
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन ती वाढावी तसेच जागतिक पातळीवरील वैज्ञानिक प्रयोगांची माहिती मिळावी. संशोधनाच्या दृष्टीने त्यांचा दृष्टिकोन विस्तृत व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने विज्ञान वारी योजनेची घोषणा केली आहे. शिक्षक दिनानिमित्ताने राज्यातील १११ शिक्षकांना पुरस्कार वितरण करताना शिक्षण विभागाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील विज्ञान क्षेत्रात आवड, कुतूहल आणि चमक असणाऱ्या गुणी व जिज्ञासू विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांना नासा येथे आधुनिक अंतराळ संशोधन, उपग्रह निर्मिती, रॉकेट तंत्रज्ञान आणि एआय तंत्रज्ञानासह वैज्ञानिक प्रयोगांची थेट माहिती मिळणार आहे.









