अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नादरम्यान शिंदेंच्या बाजूला उभे असलेले आमदार तानाजी सावंत यांनी माईकचा ताबा घेत पत्रकारांना उत्तर दिले. संजय राउत हा भोंगा सकाळी 7 वाजता चालू होतो आणि रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतो. त्याला फक्त उणीवा काढणं एवढंच येतं अशा तिखट शब्दांत तानाजी सावंत यांनी संजय राउत यांच्यावर टीका केली.(mla tanaji sawant on sanjay raut)
नुकसानग्रस्तांना शिवसेना जी मदत करत आहे त्या किटवर एकनाथ शिंदेंचा फोटो लावलेला आहे. यावर संजय राउत यानी टीका केली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता तानाजी सावंत शिंदेंसमोर भडकले. तानाजी सावंत म्हणाले, संजय राऊतला म्हणावं एक किलो धान्य आणं, माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा आणि त्याला दे. त्याला म्हणावं कमीत कमी एक बाटली पाणी तर दे. मी तुझं कौतुक करतो. बाळासाहेबांचं त्याने काय घेतलं? बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण.
हा भोंगा सकाळी 7 वाजता चालू होतो आणि रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतो. त्याला फक्त उणीवा काढणं एवढंच येतं. आज त्यांच्या एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का? एक किलो धान्य कोणाच्या घरात जाऊन देऊन त्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलंय का? असा प्रतिप्रश्नच तानाजी सावंत यांनी अत्यंत संतप्त आवेशात केला.
पुढे सावंत म्हणाले, भाऊ(एकनाथ शिंदे) ही मदत आज करत नाहीत. कोल्हापूरला ज्यावेळी झाले त्यावेळी सुद्धा लाखो लोकांच्या मदतीला भाऊच उभे राहिले होते. त्यावेळी नाव तुमचं होतं, करणारे आम्ही होतो. आज आम्ही स्वतः या ठिकाणी जाऊन जीव धोक्यात घालून शेतकऱ्याच्या बांधावर आम्ही जातोय, कारण आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत.







