धाराशिव जिल्ह्यात १३ सप्टेंबरला रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांनी बाहेर पडून शेतकऱ्यांना धीर द्यायला सुरुवात केली होती. विविध भागांत जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून दिली. या घोषणेच्या दुसऱ्या दिवशीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बाहेर पडून पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.(Mla Ranajagjitsinha Patil)
बार्शी तालुक्यातील गौडगाव, उपळे (ज), जामगाव आदी गावे धाराशिव तालुक्याला लागूनच आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी या भागाच्य़ा दौऱ्यावर होते. त्यांच्यासमवेत आमदार पाटील यांनी या भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. या परिसरातही सोयाबीनसह फळबागांचे अपरिमित नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
आपले महायुती सरकार शेतकरी बांधवांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसान अभूतपूर्व असल्याने मदतही अभूतपूर्वच असायला हवी, अशी आपली आग्रही मागणी आहे. त्यानुसार सर्व निकष बाजूला सारत सरसकट मदतीबाबत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केली आहे. अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आपले सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सरसकट मदत मिळेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील, असे पालकमंत्री गोरे, आणि आमदार राणाजगजितसिंह यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. यावेळी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्यातही केली पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा औसा पाहणी दौरा केल्यानंतर आ.पाटील यांनी लगेच तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, होनाळा, बारुळ, बसवंतवाडी, येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अतिवृष्टी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निकष बाजूला सारून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात येईल, अशी मोठी घोषणा केली आहे. आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सरसकट मदत मिळेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच आहे, अशा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
सोयाबीनचा यावर्षीचा पीक विमा मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. पीक कापणी प्रयोग मात्र व्यवस्थित करून घेणे आवश्यक आहे. त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महादेव जाधव, आनंद कंदले, उमेश पाटील, निशिगंधा पाटील, अनिल बंडगर, गोविंद हुलवणकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.








