केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सीबीएसईने विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी दिली आहे. आता दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरी मे मध्ये होईल. महाराष्ट्र राज्य मंडळाचे वेळापत्रक ३० सप्टेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.(CBSE Board Exam Time Table)
केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षा १७फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्याचप्रमाणे पुढील वर्षापासून दहावीसाठी दोन परीक्षा होणार असल्याने, दुसरी परीक्षा १५ मेपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. या सर्व परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक ‘सीबीएसई’ने नुकतेच जाहीर केले. २०२६मध्ये होणाऱ्या या परीक्षांसाठी भारतासह २६ विविध देशांमधून सुमारे ४५ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती ‘सीबीएसई’ ने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
‘सीबीएसई’ ने विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता ‘सीबीएसई’ ची दहावीची परीक्षा २०२६पासून वर्षातून दोन वेळा होईल, असे सांगण्यात आले होते. आता या दुसऱ्या परीक्षेसह दहावीच्या पहिल्या आणि बारावीच्या परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावीची दहावीतील परीक्षा नऊ मार्च रोजी संपणार असून, बारावीची परीक्षा नऊ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या परीक्षेतील एखादा पेपर झाल्यानंतर १० दिवसांनी त्याच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू होणार असून, त्यापुढील १२ दिवसांत ते पूर्ण केले जाणार आहे.










