धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे. केंद्र आणि राज्यशासन तत्परतेने बाधितांना दिलासा देण्याचे काम करीतच आहेत. अशावेळी विविध सामाजिक संस्था आणि संघटनाही उत्स्फूर्तपणे मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.अक्षरवेल महिला साहित्य मंडळानेही या कामात स्व:ताला झोकून देत पूरग्रस्त भागातील शाळकरी मुलांना उपयुक्त शैक्षणिक साहित्य पुरवले आहे. (Aksharvel Organization Dharashiv)
धाराशिव शहरात साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या अक्षरवेल महिला साहित्य मंडळातील सगळ्या महिलांनी एकत्रित येत जमा केलेल्या रक्कमेतून पूरग्रस्त भागातील शाळकरी मुला-मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे मोठे काम केले आहे. परंडा तालुक्यातील वाघे गव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर , चिवडा पॉकेट आणि चिकी पॉकेट देऊन पूरग्रस्त शाळकरी मुलांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.








