पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर MPL आणि WMPL चा उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी MCA चे अध्यक्ष आमदार रोहीत पवार यांच्यासह पदाधिकारी आणि ॲपेक्स बॉडी मेंबर उपस्थित होते. येत्या २२ जूनपर्यंत पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एमपीएलच्या सामन्यांचा थरार रंगणार असून अधिकाधिक क्रिकेट रसिकांनी हे सामने पाहण्यासाठी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील होतकरु खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जुन यावं, असे आवाहन रोहीत पवार यांनी केले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकार चित्रांगदा सिंग यांच्या भन्नाट परफॉर्मन्सने या सोहळ्याची सुरुवात झाली. ‘महाराष्ट्र प्रिमियर लीग – २०२५’ या एमपीएलच्या तिसऱ्या हंगामातील MPL आणि WMPL च्या चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी पुढील १८ दिवस १० संघ एकमेकांशी झुंजणार आहेत.
या उद्घाटनसोहळ्यावेळी ‘ड्रोन शो’ विशेष आकर्षण ठरला. या ‘ड्रोन शो’ मध्ये चितारलेल्या विविध आकृत्या आणि अक्षरांनी उपस्थित क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. पाकिस्तानसोबत नुकत्याच झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराने बजावलेल्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल तिन्ही सैन्य दलाची, तिरंग्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृतीने प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले.

