जॉर्जिया येथे सुरू असलेल्या महिलांच्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामना दुसऱ्या डावानंतरही बरोबरीत आहे. त्यामुळे दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यातील विजेती ठरवण्यासाठी सोमवारी टायब्रेकरचा अवलंब करावा लागणार आहे.(koneru humpy and divya deshmukh chess)
१५वी मानांकित दिव्या ही विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारी पहिलीच भारतीय महिला ठरली होती. त्यानंतर चौथ्या मानांकित हम्पीने चीनच्या अग्रमानांकित लेई टिंगेईवर टायब्रेकरमध्ये ५-३ अशी मात केली. दोन्ही खेळाडूंत पहिले दोन दिवस बरोबरी कायम होती. अखेरीस टायब्रेकरमध्ये हम्पीने बाजी मारली. त्यामुळे या दोघीही भारतीय कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.
२०२१पासून महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाला प्रारंभ झाला. यापूर्वी फक्त पुरुषांसाठीच विश्वचषक खेळवण्यात यायचा. यापूर्वी २०२१ व २०२३ मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारताची एकही खेळाडू उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचली नव्हती.
भारताच्या दोन जणींनी थेट अंतिम फेरीत मजल
भारताच्या दोन जणींनी थेट अंतिम फेरीत मजल मारून बुद्धिबळातील देशाची ताकद सिद्ध केली आहे. महिला विश्वचषकातील अव्वल तीन खेळाडू (विजेती, उपविजेती, तिसऱ्या क्रमांकावरील) पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. कँडिडेट्स स्पर्धेतील विजेता मग जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत गतविजेतीशी दोन हात करेल. तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकून खेळाडूंना कँडिडेट्सची पात्रता मिळवण्याची संधी आहे. एप्रिलमध्ये कँडिडेट्स स्पर्धा होईल. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात महिलांची जागतिक बुद्धिबळ लढत रंगेल.
आज ४.३० वाजता टायब्रेकरला सुरुवात
दरम्यान, उभय खेळाडूंत शनिवारी पहिला डाव बरोबरीत सुटला होता. त्यानंतर रविवारी दुसऱ्या डावातही ३४ चालींनंतर दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली. आता सोमवारी टायब्रेक्समध्ये कमी वेळेत रॅपिड प्रकारात बुद्धिबळ खेळवण्यात येईल. पहिल्या टायब्रेकमध्ये १५ व १० डाव होतील. मग बरोबरी कायम राहिली, तर दुसरा टायब्रेक प्रत्येकी १०-१० रॅपिड डावांचा होईल. सोमवारी म्हणजेच आज ४.३० वाजता टायब्रेकरला सुरुवात होईल.