शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा आज रायगडमध्ये होत आहे. या मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. महाराष्ट्रात मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (raj thakarey shetkari kamgar paksha)
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्यातील मुलांना हिंदी कसे शिकवले जाईल याचा विचार करतोय
हल्लीचे आजार आणि सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण काही वेगळं नाही. महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरत आहेत. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष..३ ऑगस्ट १९४७ ला स्थापना झाली अन् १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. महाराष्ट्रातला स्वातंत्र्यपूर्व काळातला पक्ष… इतक्या वर्षानंतरही हे सर्व टिकून आहे आश्चर्च आहे, असं राज ठाकरे म्हणाले. आजचा प्रमुख रायगड जिल्ह्याचा मुद्दा सर्वांनी समजून घेतला पाहिजे. आज ज्या प्रकारे जेव्हा जेव्हा चांगले रस्ते आले आहेत आणि राज्यकर्त्यांचे लक्ष नसेल तर तो प्रदेश बरबाद व्हायला वेळ लागत नाही. आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्यातील मुलांना हिंदी कसे शिकवले जाईल याचा विचार करतोय. मात्र महाराष्ट्रातला मराठी माणूस, महाराष्ट्रातला भूमीपूत्र याचा काही विचार नाही. याचे विदारक चित्र म्हणजे रायगड जिल्हा.
शेतकऱ्यांच्या जमिनी हातातून चालल्या आहेत, उद्योग येत आहेत, उद्योगांबरोबर बाहेरच्या राज्यातील लोकंही येत आहेत. अशावेळेला सर्व पक्षांनी रायगडच्या भूमिपुत्रांना प्राधान्य मिळालं पाहिजे यासाठी लढलं पाहिजे अशी भूमिका यावेळी राज ठाकरे यांनी घेतली आहे.